चेन्नई : टीम इंडियाने इंग्लंडचा 4-0 असा धुव्वा उडवून 2016 या वर्षाला मोठ्या दिमाखात निरोप दिला. आता 2017 या वर्षात टीम इंडिया परदेशातही कसोटी मालिका जिंकण्याचा नेटाने प्रयत्न करेल, असा विश्वास डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाने व्यक्त केला आहे.
घरात शेर आणि परदेशात ढेर ही टीम इंडियावरची टीका खोडून काढण्याचा आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा निर्धार असल्याचं जाडेजानं सांगितलं.
भारतीय संघाने 2016 या वर्षात अकरापैकी आठ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2014 सालच्या सर्वाधिक आठ कसोटी सामने जिंकण्याच्या टीम इंडियाच्या विक्रमाची विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यंदा बरोबरी साधली.
विशेष म्हणजे 2014 साली भारतीय संघाने चौदा कसोटी सामन्यांमध्ये खेळून त्यात आठ विजय, तीन पराभव आणि तीन अनिर्णीत अशी कामगिरी बजावली होती.