सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली.


टीम इंडियाच्या विजयात विराट कोहलीने कर्णधारास साजेशी भूमिका बजावली. त्याने 96 चेंडूंत 19 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 129 धावांची खेळी उभारली. तर अजिंक्य रहाणेने नाबाद 34 धावांची खेळी केली.

त्याआधी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव 204 धावांत गुंडाळला. मुंबईच्या शार्दूल ठाकूरने 52 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट्स काढून त्याला साथ दिली.

25 वर्षात पहिला मालिका विजय

  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने विजय