नवी दिल्ली : बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच रेल्वे मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि टेक्निशियनसह इतर पदांवर जवळपास 90 हजार जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी शिक्षणाची किमान मर्यादा दहावी पास आणि आयटीआयचं प्रमाणपत्र अशी आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, क गटातील प्राथमिक श्रेणी आणि द्वितीय श्रेणीच्या 89 हजार 409 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती जगातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेपैकी एक आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर हे अर्ज मागवण्यात आले आहेत. क गटातील प्रथम श्रेणीच्या जागेसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 5 मार्च, तर द्वितीय श्रेणीसाठी 12 मार्च आहे.
क गटातील द्वितीय श्रेणीत टेक्निशियन म्हणजेच फिटर, क्रेन ड्रायव्हर अशा विविध पदांचा समावेश आहे. तर क गटातील प्रथम श्रेणीत ट्रॅक मेंटेनर, पॉईंट मॅन, हेल्पर आणि गेटमन अशा जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. द्वितीय श्रेणीच्या नोकरीसाठी 18 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तर प्रथम श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 31 वर्षे आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार, क गटातील द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्याला पे स्केल 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत असेल. तर क गटातील प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत पे स्केल आहे. एप्रिल आणि मे 2018 पर्यंत या जागांसाठी परीक्षा घेण्याची तयारी रेल्वेकडून सुरु आहे.