डबलिन : टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात यजमानांचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कुलदीप यादवने चार आणि यजुवेंद्र चहलने तीन फलंदाजांना माघारी धाडून, आयर्लंडला नऊ बाद 132 धावांत रोखलं.


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने 97, तर शिखर धवनने 74 धावा केल्या.

या खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाच बाद 208 धावा करत आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं.

आयपीएलनंतर नव्या दमाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आयर्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. रोहित शर्माने 61 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकात तो बाद झाला.

शिखर धवननेही 45 चेंडू खेळत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 74 धावा ठोकल्या. सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर केविन ऑब्रायनच्या चेंडूवर शिखर धवन बाद झाला. त्यानतंर आलेला सुरेश रैना केवळ दहा धावा करुन माघारी परतला.

दरम्यान, 208 धावा केल्या असल्या तरी अखेरच्या षटकात भारताने झटपट विकेट गमावल्या. आयर्लंडच्या पीटर चेसने त्याच्या करिअरमधील तिसऱ्याच टी-20 सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला. सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने बाद केलं.

भारताने पहिल्या 160 धावा 15.5 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता केल्या. मात्र नंतरच्या 48 धावा करण्यासाठी भारताला पाच विकेट गमवाव्या लागल्या.