नॉटिंगहॅम : टीम इंडियाने इंग्लंडवर आठ विकेट्सने मात करत तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सलामीवीर रोहित शर्मा या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने 82 चेंडूत शतक पूर्ण करत महत्त्वाची खेळी केली, तर त्याला कर्णधार विराट कोहलीने 75 धावांची खेळी करत साथ दिली.

या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 55 चेंडू आणि आठ विकेट्स राखून इंग्लंडवर मात केली. कुलदीप यादवने रचला पाया, रोहित शर्मा झालासे कळस असं भारताच्या या विजयाचं वर्णन करता येईल. कुलदीप यादवने सहा विकेट्स घेऊन आणि रोहित शर्माने नाबाद 137 धावांची खेळी उभारून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

रोहित शर्माचं आणखी एक शतक

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माने नॉटिंगहॅम वन डेत आपल्या कारकीर्दीतलं अठरावं शतक साजरं केलं. त्याच्या शतकाने टीम इंडियाचा 269 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणखी सोपा झाला. रोहितने इंग्लंड दौऱ्यावरचं हे दुसरं शतक ठरलं. त्याने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातही शतक झळकावलं होतं. नॉटिंगहॅम वन डेत रोहितने 83 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांसह शतक झळकावलं. या सामन्यात त्याने 114 चेंडूंत नाबाद 137 धावांची खेळी उभारली, ज्यामध्ये 15 चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.

कुलदीप यादवचा विक्रमी षटकार

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडून नॉटिगहॅम वन डेला कलाटणी दिली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 50 षटकांमध्ये सर्व बाद 268 धावांवर आटोपला.

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने 73 धावांची सलामी देऊन इंग्लंडच्या डावाचा भक्कम पाया रचला होता. पण कुलदीप यादवने त्या दोघांसह ज्यो रूटचाही काटा काढला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉस बटलर या सेट फलंदाजांनाही त्याने माघारी काढलं आणि इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

कुलदीप यादवला उमेश यादवने दोन आणि यजुवेंद्र चहलने एक विकेट घेऊन मोलाची साथ दिली. मात्र कुलदीप यादवने इंग्लंडच्या सर्व सेट झालेल्या फलंदाजांवर हल्ला चढवत सर्वांना बाद केलं.

यामध्ये जेसन रॉय (38), जॉनी बेअरस्टो (38), जो रुट (3), बेन स्टोक्स (50), जॉस बटलर (53) आणि डेव्हिड विली (1) यांना कुलदीपने माघारी धाडलं.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडने दमदार सुरुवात केली, मात्र कुलदीप यादवने सलामीवीरांची भागीदारी मोडत इतर फलंदाजांनाही माघारी धाडलं. ज्यामुळे भारतासमोर विजयासाठी 269 धावांचं माफक आव्हान उभं राहिलं.

वन डे क्रिकेटच्या इतिहासात 25 धावा देऊन सहा विकेट घेणारा कुलदीप जगातला पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगच्या (5/32 वि. वेस्ट इंडिज, जानेवारी 2005) नावावर होता.