नाशिक : पावसाळा सुरु होताच नाशिकच्या ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ आली आहे. सुरगाणा तालुक्यात चार, तर कळवणमध्ये एक, असे पाच बळी अवघ्या तीन दिवसात गेले आहेत. शिवाय शेकडो जणांना लागण झाली आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या मान्सून पूर्व कामांचे दावे फोल ठरवणारी आहे.

एखाद्या गावाची शोकांतिका काय असते, प्रशासकीय अनास्था काय असते हे जर बघायचं असेल तर सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावाला भेट द्यायला पाहिजे. आज या गावात स्मशान शांतता आहे, नागरिकांमध्ये संताप आहे, भावनांचा उद्रेक आहे.

विद्यार्थ्यांची शाळा बंद असून शाळेचं रुग्णालयात रूपांतर करण्यात आलं आहे. कारण, या गावात तीन दिवसात चार जण दगावले आहेत. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी मिसळल्याने 850 लोकसंख्या असणाऱ्या गावातील 150 हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.

कधी नव्हे ते आरोग्य कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत. चिखल तुडवत घरोघरी प्रबोधन सुरु आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी एकच विहीर आणि तीही आता बंद करण्यात आली आहे.

विहिरीचा पाणी पुरवठा बंद करून गावात टँकरच्या माध्यमातून भर पावसात पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या गावाने कधी उन्हाळ्यात टँकर बघितला होता, त्यांना आता तासनतास हंडा भर पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

गावात पाण्याच्या दोन टाक्या उभारण्यात आल्या. लाखो रुपये खर्च झाले. मात्र अद्याप योजना पूर्ण झाली नाही. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. नागरिकांच्या घरापर्यंत पाईपलाईन नाही, टाकीत पाणी नाही अशी भीषण परिस्थिती गावात आहे

पावसाळ्याच्या सुरुवातीला गावातील विहिरी निर्जंतुक केल्याचे दावे प्रशासनाने केले होते. मात्र ते सर्व फोल ठरले असून ग्रामीण भागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.