कोलकाता : भारतीय क्रिकेटमध्ये होतेय एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. हा नवा अध्याय लिहिला जाणार आहे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर. भारत आणि बांगलादेश संघांमध्ये मालिकेतला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला जातोय आणि हा कसोटी सामना भारतात पहिल्यांदाच डे-नाईट खेळवला जाणार आहे.

2015 साली डे नाईट कसोटी क्रिकेटचा जन्म झाल्यापासून भारतात एकही सामना खेळवण्यात आला नव्हता. पण सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आणि अवघ्या महिनाभरातच दादानं डे-नाईट कसोटी खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या कसोटीच्या निमित्तानं पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी खेळणार आहेत.

2015 च्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 फॉरमॅट लोकप्रिय होत गेलं आणि साहजिकच त्याचा परिणाम कसोटी क्रिकेटवर झाला. 2015 साली आयसीसीने कसोटी क्रिकेटला चालना देण्यासाठी डे नाइट कसोटीची संकल्पना मांडली आणि नोव्हेंबर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात गुलाबी चेंडूवर पहिली डे नाईट कसोटी खेळवण्यात आली.

कोलकाता कसोटी ही आजवरची 12 वी डे नाईट कसोटी ठरणार आहे. आयसीसी कसोटी मान्यता असलेल्या 12पैकी आठ देशांनी डे नाईट कसोटी खेळली आहे. त्यात ऑस्ट्रेलियानं पाच, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका संघांनी प्रत्येकी तीन, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडनं प्रत्येकी 2 आणि झिम्बाब्वेनं एकदा डे नाईट कसोटी खेळली आहे.

डे-नाईट कसोटी ही गुलाबी चेंडूवर खेळवली जाते. भारत आणि बांगलादेश पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत असल्यानं दोन्ही संघातील फलंदाजांचा कस लागणार आहे. टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवला दुलीप करंडकात गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव आहे. पण त्याला आता तीन वर्ष लोटली आहेत. त्यासोबतच संधीप्रकाश, दव, सरावासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे टीम इंडियासमोरचं आव्हान नक्कीच सोपं नसेल.

कसा होईल हा सामना
दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल.

पहिलं सत्र: दुपारी 1  ते 3

उपाहाराची वेळ : दुपारी 3 ते 3.40

दुसरं सत्र: 3.40 ते 5.40

चहापानाची वेळ: संध्याकाळी 5.40 ते 6

तिसरं सत्र: संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत