श्रीलंकेचा धुव्वा, भारताच्या अंडर-19 संघाचं सहाव्यांदा आशिया चषकावर नाव
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2018 07:06 PM (IST)
बांगलादेशची राजधानी ढाक्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा डाव 160 धावात गुंडाळला. पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं.
ढाका : भारताच्या अंडर-19 संघाने सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 144 धावांनी मात करत भारताच्या युवा खेळाडूंनी हा चषक जिंकला. बांगलादेशची राजधानी ढाक्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा डाव 160 धावात गुंडाळला. अंडर नाईन्टिन आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला विजयासाठी 305 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या यशस्वी जैसवालसह चार फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत तीन बाद 304 धावांचा डोंगर उभारला. यशस्वी जैसवालने 113 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह 85 धावांची खेळी उभारली. त्याने अनुज रावतसह सलामीला 121 धावांची भागीदारी रचली. अनुज रावतने 57 धावांची खेळी केली. कर्णधार प्रभसिमरन मानने नाबाद 65, तर आयुष बदोनीने नाबाद 52 धावा फटकावल्या. 305 धावांचा पाठलाग करता आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठी मजल मारता आली नाही. हर्ष त्यागीने एकट्याने सहा फलंदाजांना माघारी धाडलं. दोन विकेट घेऊन त्याला सिद्धार्थ देसाईनेही छान साथ दिली. तर मोहित जंगराने एका फलंदाजाला माघारी धाडलं.