मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या 2018 मधील कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला आहे. यामुळे भारतीय संघ तब्बल 10 वर्षानंतर आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.


आयपीएल 2018 नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार होता मात्र, आता या दौऱ्याआधी टीम इंडियाचा आयर्लंड दौरा आखण्यात आला आहे. भारतीय संघ जून महिन्याच्या शेवटी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं दोन टी-20 सामन्यांची छोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं काल (बुधवार) एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. भारतीय क्रिकेट टीम तब्बल 10 वर्षानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे.

या दौऱ्यानंतर भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंडच्या दौरा करणार आहे. तिथं तीन टी-20, तीन वनडे आणि पाच कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे.
भारतानं 2007 साली आयर्लंडचा दौरा केला होता. तेव्हा भारतानं एक वनडे सामना खेळला होता. भारतानं हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता. तर भारत

आयर्लंडविरुद्ध फक्त एकच टी-20 सामना खेळला. 2009 साली टी-20 विश्वचषक मालिकेत नॉटिंगहममध्ये भारत विरुद्ध आयर्लंडचा सामना झाला होता.

आता तब्बल 10 वर्षांनी भारत आयर्लंडच्या भूमीवर टी-20 मालिका खेळणार आहे. 27 आणि 29 जूनला हे दोन सामने खेळविण्यात येणार आहेत.

बीसीसीआयनं जारी केलेल्या पत्रकानुसार, 'भारतीय क्रिकेट संघ जुलैला इंग्लंड दौऱ्याआधी दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करेल. हे दोन टी-20 सामने 27 आणि 29 जूनला डबलिनमध्ये खेळवण्यात येतील.'