लंडन : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळणारा रोहित शर्मा त्याची खासियत असलेल्या सलामीच्या जागेवर पुन्हा फलंदाजी करताना दिसणार आहे. उद्या (मंगळवार) हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल.
भारताने सलामीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर 45 धावांनी दणदणीत विजय साजरा केला खरा, पण त्या सामन्यात पावसाने भारतीय फलंदाजांना केवळ 26 षटकंच मॅचप्रॅक्टिसची संधी दिली. त्यामुळं बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांना पूर्ण 50 षटकं फलंदाजीची संधी मिळावी, अशी अपेक्षा कर्णधार विराट कोहली करत असेल.
या सामन्याच्या निमित्ताने रोहित शर्मा पुन्हा सलामीला खेळताना दिसेल. 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितला सलामीला खेळवण्याचा, तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला होता. आता पुन्हा त्याच भूमिकेत रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान गाजवायला उत्सुक असेल.
शिखर धवन, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला गवसलेला सूर ही चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच्या पहिल्या सराव सामन्यात भारताच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. पण सलामीला अजिंक्य रहाणेचं अपयश टीम इंडियाच्या दृष्टीने चिंता वाढवणारं मानलं जात आहे.
केदार जाधवला पहिल्या सराव सामन्यात फलंदाजीची संधी मिळू शकलेली नाही. त्यामुळं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीत बढती देण्याचा प्रयोग भारतीय संघव्यवस्थापनाकडून होण्याची शक्यता आहे.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 189 धावांत गुंडाळून आपण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. पण आता भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव यांच्यापैकी कुणा दोघांना अकरा जणांच्या अंतिम संघात संधी द्यायची, याचा विचार विराट कोहलीला करावा लागणार आहे.
हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाचं अष्टपैलुत्त्व त्यांच्या निवडीला प्राधान्य देणारं ठरण्याची शक्यता आहे.