कॅण्डी/मुंबई : भारत आणि श्रीलंका संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या (गुरुवार) कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या ताकदीला साजेसा खेळ करून दणदणीत विजय साजरा केला होता. आता कॅण्डीच्या वन डेतही भारतीय संघ श्रीलंकेवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
सलामीवीर शिखर धवनच्या खणखणीत शतकाने दम्बुलाच्या वन डेत टीम इंडियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका या दोन संघांच्या ताकदीतला फरक लक्षात घेता, दम्बुलाच्या वन डेत टीम इंडियाचा विजय अपेक्षितच होता. पण विराट कोहलीच्या फौजेने केवळ विजय साजरा केला नाही, तर उपुल थरंगाच्या फौजेचा अक्षरश: फडशा पाडला.
बलाढ्य टीम इंडियाने या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या एकतर्फी लढाईच्या पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका संघ कॅण्डीच्या रणांगणात पुन्हा आमनेसामने येत आहेत. उभय संघांमधला दुसरा वन डे सामना हा कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाच्या 2019 सालच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात म्हणून श्रीलंका दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेकडे पाहिलं जातं. त्यामुळेच सलामीच्या वन डेत अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या भारताच्या बदली फिरकी गोलंदाजांनी बजावलेली कामगिरी बीसीसीआयची निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनाची अपेक्षा उंचावणारी ठरली आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने या मालिकेसाठी मोहम्मद शमी, उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या चार प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. दम्बुलाच्या वन डेत भारताच्या बदली फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा अवघ्या 216 धावांत खुर्दा उडवून, टीम इंडियाला महारथी गोलंदाजांची उणीव भासू दिली नाही.
सलामीच्या निरोशन डिकवेलाने धनुष्का गुणतिलका आणि कुशल मेंडिसच्या साथीने श्रीलंकेला 25व्या षटकातच दोन बाद 139 अशी भक्कम स्थितीत मजल मारून दिली होती. त्या वेळी श्रीलंका भारताने दिलेल्या आव्हानाच सहज पाठलाग करेन असं वाटत होतं. पण अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीने या सामन्याला कलाटणी दिली.
अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी त्रिकुटाइतकंच शिखर धवनचं नाबाद शतक आणि त्यानं विराट कोहलीच्या साथीने रचलेली 197 धावांची अभेद्य भागीदारी टीम इंडियाची प्रचंड ताकद दाखवून देणारी ठरली. रोहित शर्माचं धावचीत होणं हीच एक बाब भारतीय संघाच्या दम्बुला वन डेवरच्या निर्विवाद वर्चस्वाला गालबोट ठरली. कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत एकटा रोहित शर्माच नाही, तर संपूर्ण भारतीय संघाने छोट्या-छोट्या चुका टाळण्याची गरज आहे.
श्रीलंकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मावर भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात रोहितने आपली विकेट स्वस्त होऊ न देता धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणं अपेक्षित आहे. त्याची सुरुवात कॅण्डीत झाली, तर टीम इंडियाचा आणखी एक विजय सोपा होईल.
विजयरथावर आरुढ टीम इंडिया आणखी एका विजयासाठी सज्ज
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 Aug 2017 10:56 PM (IST)
पहिल्या वन डेत श्रीलंकेवर 9 विकेट्स राखून मात केल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या वन डेतही विजयाची मालिका कायम राखण्यासाठी उत्सुक असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -