नवी दिल्ली : डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण असताना भारत आणि अमेरिकेचं सैन्य संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनजवळील जॉईंट-बेस लुईस मॅक-कोर्डमध्ये 14 ते 17 सप्टेंबरदरम्यान हा संयुक्त युद्ध सराव होणार आहे.


दरवर्षी भारत आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये होणाऱ्या या सरावाला ‘युद्ध सराव’ असेच नाव देण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील हा 13 वा ‘युद्ध सराव’ असून, पहिला ‘युद्ध सराव’ 2004 साली झाला होता. गेल्या वर्षी उत्तराखंडमधील चौबटियामध्ये युद्ध सराव झाला होतं.

सैन्य मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी, तसेच सीमा सुरक्षाही या सरावातील महत्त्वाचा भाग असेल. त्याचसोबत काऊंटर इनसर्जेंसी, काऊंटर टेररिझम आणि यूएन चार्टरद्वारे शांती मिशनही या युद्ध सरावातील महत्त्वाचा विषय असेल.

दरम्यान, या युद्ध सरावात भारतीय सैन्यातील इन्फेंन्ट्री बटालियन सहभागी होणार असून, अमेरिकेतील पॅसेफिक कमांडोची स्ट्रायकर बटालियन सहभागी होणार आहे.