लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांमधल्या फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गटवार साखळी सामन्यांअखेरीस जाहीर झालेल्या क्रमवारीत विराट अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या, तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर होता. डिव्हिलियर्सच्या खात्यात विराटपेक्षा 22 गुण अधिक, तर वॉर्नरच्या खात्यात विराटपेक्षा 19 गुण अधिक होते.
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 81 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 76 धावांची खेळी उभारुन आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.
चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या तिन्ही धावांचा रतीब घालणाऱ्या शिखर धवनने 'टॉप टेन'मध्ये पुनरागमन केलं आहे. धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्ध 68, श्रीलंकेविरुद्ध 125 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 78 धावांची खेळी केली. या कामगिरीने त्याला आयसीसी क्रमवारीत दहावं स्थान मिळवून दिलं आहे.