मुंबई : गुवाहाटीतील या सामन्यानंतर उभय संघ हैदराबादच्या रणांगणात तिसऱ्या आणि अंतिम ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आमनेसामने येतायत. यावेळी मात्र विराटचा संघ हा सामना जिंकून मालिकाविजयासाठी आसुसलेला असेल.
मॉईजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड याच्या तडाखेबंद शतकी भागिदारीनं ऑस्ट्रेलियायाला दुसऱ्या ट्वेंटी ट्वेन्टी सामन्यात 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
गुवाहाटीच्या सामन्यात आधी भारतीय फलंदाजांचं अपयश आणि त्यानंतर गोलंदाजांची खराब कामगिरी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली. त्यात जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, मनीष पांडेसारखे खंदे शिलेदार केवळ 27 धावात तंबूत परतल्यानं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे केवळ 119 धावांचं माफक लक्ष्य कंगारुनी 15 षटकं आणि तीन चेंडूतच पार केल. तेही केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात. कांगारुंच्या या विजयानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे त्यामुळे हैदराबादची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान आजवर 5 ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका झाल्या आहेत. त्यात तीन वेळा भारतानं आणि एकदा ऑस्ट्रेलियानं बाजी मारली आहे. तर उभय संघामधील एक मालिका अनिर्णित राहिली आहे. 2015-16 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-0 अशी धूळ चारली होती. आकडेवारी पाहता भारताची कामगिरी उजवी वाटत असली मागील सामन्यातील अपयश चिंतेची बाब ठरू शकते.
यावर्षी भारतानं कांगारुंना कसोटी मालिकेत 2-1 तर वन डेत 4-1 अशी मात दिलीये. ट्वेंटी ट्वेन्टी तही विराट आणि शिलेदारांकडून अशाच मालिका विजयाची अपेक्षा केली जातेय. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी हैदराबादच्या अंतिम आणि निर्णायक लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली तर टीम इंडियाला मालिकविजयापासून रोखणं शक्य नाही.
टी-20 मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
12 Oct 2017 11:10 PM (IST)
मॉईजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड याच्या तडाखेबंद शतकी भागिदारीनं ऑस्ट्रेलियायाला दुसऱ्या ट्वेंटी ट्वेन्टी सामन्यात 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -