नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज दिवसभर चर्चा होती एका अतिशय अनपेक्षित भेटीची. ही भेट होती अजित पवार आणि नितीन गडकरींची. काल रात्री उशिरा गडकरींच्या '2, मोतीलाल नेहरु प्लेस' या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली.


अजित पवार हे कायम राज्याच्या राजकारणात रमणारे, दिल्लीत ते फारच क्वचित दिसतात. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीबद्दल 'एबीपी माझा'शी बोलताना अजितदादांनी ही भेट पुणे आणि परिसरातल्या रस्ते प्रकल्पांबद्दल असल्याचं सांगितलं. या भेटीचा इतर कुठला राजकीय हेतू नसल्याचा दावाही त्यांनी केला.

काल रात्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते गडकरींच्या निवासस्थानी होते. या भेटीवेळी त्यांच्यासोबत शेकापचे जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. जयंत पाटील यांनीही मुंबई-गोवा महामार्गातल्या काही मुद्द्यांसंदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं.

विधानभवनातल्या जुन्या आठवणींवर अगदी दिलखुलास गप्पा अजितदादा-गडकरींसोबत झाल्या असं त्यांनी सांगितलं. एरव्ही पवार-मोदी या भेटीची राजधानी चर्चा होत असते, पण आज गडकरी-अजितदादा यांच्या भेटीनं दिवस गाजला.