ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सलामीलाच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. विजयासाठी 174 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवन आणि दिनेश कार्तिकने केलेले प्रयत्न अपुरे पडले. भारतीय संघ प्रत्युत्तरात 7  बाद 169 धावाच करू शकला.


या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 17 षटकांत 174 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय फलंदाजांना 17 षटकांत 7 बाद 169 धावांचीच मजल मारता आली. शिखर धवननं 42 चेंडूंत 76 धावांची खेळी उभारून भारताच्या डावाचा पाया रचला. मग दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतनं 23 चेंडूंत 51 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाची आशा दाखवली. पण पंत (20), कार्तिक (30) आणि कृणाल पंड्याही मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाले आणि टीम इंडियाला हार स्वीकारावी लागली. ऑस्ट्रेलियाकडून झंपा, स्टॉयनिसनं 2-2 गडी बाद केले.

त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पावसाच्या व्यत्ययानंतर 17 षटकांत चार बाद 158 धावांची मजल मारली. पण डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाला विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिसनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 79 धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या डावात मोलाची ठरली. मॅक्सवेलनं 24 चेंडूंत चार षटकारांसह 46 धावांची, तर स्टॉयनिसनं 19 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 33 धावांची खेळी उभारली.

भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. डार्सी शॉर्ट 7  धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने 24 चेंडूत 27 तर लीनने 20 चेंडूत 37 धावा फटकावल्या. भारताकडून कुलदीपने 2 तर अहमद, बुमराने 1-1 गडी बाद केला.