कोलंबो : टीम इंडियाने कोलंबो कसोटीवरील पकड आणखी मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 230 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात फॉलो ऑनची नामुष्की ओढावलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात सावध फलंदाजी केली. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 209 धावा केल्या.


भारताकडे अजूनही 230 धावांची आघाडी आहे. श्रीलंकेच्या दिमूथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिसने टिच्चून फलंदाजी करत मोठी भागीदारी रचून श्रीलंकेचा दुसरा डाव सावरला. मात्र हार्दिक पंड्याने ही भागीदारी तोडली. मेंडिस शतकी खेळी करुन 110 धावांवर बाद झाला. तर करुणारत्ने सध्या 92 धावांवर खेळत आहे.

तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 2 बाद 50 धावांवरुन पुढे खेळण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेचा पहिला डाव केवळ 183 धावांवर आटोपला.

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पाच विकेट घेत श्रीलंकेचा अर्धा संघ एकट्याने माघारी पाठवला. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 2, तर उमेश यादवने एक विकेट घेतली.

या कसोटीत टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केला होता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी खेळी आणि अश्विन, जाडेजाच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने मोठी मजल मारली.

पुजारा 133 आणि अजिंक्य रहाणे 132 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या अश्विन आणि साहा आणि जाडेजाने अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला. श्रीलंकेकडून रंगाना हेराथने 4 बळी घेतले. मात्र, इतर कोणत्याही गोलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही.