इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात हिंदू धर्मीय दर्शन लाल यांचाही समावेश आहे. पाकिस्तानात तब्बल 20 वर्षांनंतर हिंदू धर्मीयाला मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्यात आले आहे.

राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी 47 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात 19 राज्यमंत्री आहेत.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चार प्रांतांमधील समन्वयाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. 65 वर्षीय दर्शन लाल हे पेशाने डॉक्टर आहेत आणि सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात प्रॅक्टिस करतात.

2013 मध्ये दर्शन लाल पीएमएल-एन पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्यांक प्रवर्गातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

दरम्यान, नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण आणि ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे ख्वाजा आसिफ यांना अब्बासी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून निवडले आहे. पाकिस्तान सरकारमध्ये 2013 सालापासून कुणीही परराष्ट्रमंत्री नव्हतं.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना गेल्या आठवड्यात पनामा पेपर्स प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत दोषी ठरवले आणि पंतप्रधानपदावरुन त्यांची गच्छंती झाली. त्यानंतर शाहिद खाकन अब्बासी हे नवे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.