मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पंड्याने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळले आहेत.

"डॉ. आंबेडकरांबद्दल मी कोणतीही अपमानजनक टिप्पणी केली नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केलं असून, त्यामध्ये माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीचा वापर केला आहे," असं पंड्याने स्पष्ट केलं आहे.

"माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे," असंही हार्दिक पंड्याने नमूद केलं आहे.


हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करुन त्यांचा अपमान केल्याच्या अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पसरल्या आहेत. पण मला याबाबात माझी बाजू स्पष्ट करायची आहे. ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मी ट्वीट अथवा वक्तव्य केलेलं नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केलं असून, त्यामध्ये माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीचा वापर केला आहे. मी केवळ माझं अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनच ट्वीट करतो.

माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि सर्व समाजबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे. मी कधीही  अशाप्रकारच्या वादात पडत नाही, ज्यात एखादा समाज निशाण्यावर येईल. मी सोशल मीडियाचा वापर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी करतो.

संबंधित ट्वीट बनावट असून मी ते केलेलं नाही, हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात आवश्यक पुरावे उपलब्ध करुन देईन. माझी प्रतिमा मलीन व्हावी ह्यासाठीच कोणीतरी जाणीवपूर्वक हे ट्वीट केल्याचा मुद्दाही उपस्थित करणार आहे. सध्या देशातील अनेक प्रसिद्ध लोकांना याचा सामना करावा लागत आहे.

काय आहे प्रकरण?

पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप करत जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती. ती कोर्टाने मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हार्दिक पंड्या अडचणीत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

ट्वीटमुळे पंड्या अडचणीत

हार्दिक पंड्याने 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

पंड्याने बाबासाहेबांबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने, त्याने दलित समाजाच्या भावना भडकवल्या, असा आरोप मेघवाल यांनी केला आहे.

पंड्याचं ट्वीट, मेघवाल यांचा दावा

पंड्याने ‘कोण आंबेडकर?’ असं ट्विट केल्याचा दावा मेघवाल यांनी केल्याचं वृत्त, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

सध्या पंड्याच्या ट्विटवर 26 डिसेंबर 2017 रोजी कोणतंही ट्वीट दिसत नाही. त्यामुळे पंड्याच्या नावे केलेलं ट्वीट बनावट अकाऊंटवरुनही असू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र सध्या त्याबाबत काहीही स्पष्ट न झाल्याने कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.