नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असला, तरी त्यानंतरच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारताच्या वन डे संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीनं नागपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेचा आगामी दौरा लक्षात घेऊन विराटला विश्रांती देण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पण डिसेंबर महिन्यात विराट आणि अनुष्काचं लग्न असल्याची चर्चाही रंगली आहे.

विराट कोहलीने कारकीर्दीतलं पाचवं द्विशतक झळकावून नागपूर कसोटीवर टीम इंडियाची पकड घट्ट केली होती. विराटचं हे यंदाच्या मोसमातलं दुसरं कसोटी द्विशतक ठरलं. त्याने 259 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह द्विशतकाला गवसणी घातली. 213 धावांवर तो बाद झाला.

नागपूर कसोटीत भारताचा 1 डाव 239 धावांनी विजय


पंजाबचा मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौल हा भारताच्या वन डे संघातला नवा चेहरा आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 50 सामन्यांमध्ये 175 विकेट्स घेतल्या आहेत. सलामीच्या शिखर धवनने तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.