जोहान्सबर्ग : टीम इंडियाने जोहान्सबर्गच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत नऊ बाद 175 धावांचीच मजल मारता आली. भुवनेश्वर कुमारने 24 धावांत 5 फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयाचा कळस उभारला. तर जयदेव उनाडकट, हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येक एक विकेट घेतली.
त्याआधी शिखर धवनने 39 चेंडूंत 72 धावांची खेळी उभारून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांनी ही खेळी सजवली. भारताच्या इतर फलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकी गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला. त्यामुळंच टीम इंडियाला 20 षटकांत पाच बाद 203 धावांची मजल मारता आली.
विराट कोहलीने दोन चौकार आणि एका षटकारासह 26 धावांची खेळी उभारली. धवन आणि विराटने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी रचली. धवन आणि मनीष पांडेने चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली.
मनीष पांडेने नाबाद 29 धावांची, महेंद्रसिंग धोनीने 16 धावांची, तर हार्दिक पंड्याने नाबाद 13 धावांची खेळी केली. त्याआधी, सलामीच्या रोहित शर्माने नऊ चेंडूंत 21 धावांची आणि सुरेश रैनाने सात चेंडूंत 15 धावांची खेळी केली.
स्पोर्ट्स डेस्ट, एबीपी माझा