बंगळुरु : मोहम्मद सिराजच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर भारतीय अ संघाने चार दिवसीय कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाचा एक डाव आणि 30 धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात 56 धावा देऊन पाच विकेट घेणाऱ्या सिराजने दुसऱ्या डावातही पाच विकेट घेतल्या. संपूर्ण सामन्यात त्याने 129 धावा देऊन दहा फलंदाजांना माघारी धाडलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला होता. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने मयंक अग्रवाल (220) आणि पृथ्वी शॉ (136) यांच्या खेळीच्या बळावर आठ बाद 584 धावांवर आपला डाव घोषित केला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी रुडी सेकेंड आणि शॉन वॉन बर्ग यांनी कसोटी अनिर्णित ठेवण्याचा पूर्ण केला. मात्र अंतिम क्षणाला दक्षिण आफ्रिकेचा डाव 308 धावांवर आटोपला.
दक्षिण आफ्रिका अ संघाने मंगळवारी सकाळी चार बाद 99 धावांवरुन पुढे खेळण्यासाठी सुरुवात केली. नाबाद फलंदाज जुबैर हमजा (63), सेकेंड (94) आणि वॉन बर्ग (50) यांनी अर्धशतकी खेळी केली. हमजा खेळ सुरु झाला त्यानंतर नवव्या षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर सेकेंड आणि वॉन बर्ग यांनी पुढच्या 50 षटकांपर्यंत मजबूत भागीदारी रचली, ज्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
रजनीश गुरबाणीने (45 धावा देऊन दोन विकेट) 99 व्या षटकात वॉन बर्गची विकेट काढली आणि त्यांची 119 धावांची भागीदारी तोडली. खालच्या फळीतील फलंदाज डेन पीट (37 चेंडूत आठ धावा) आणि मालुसी सिबोतो (50 चेंडूत नाबाद सात) यांनीही खेळपट्टीवर खुप वेळ तग धरला होता. याचदरम्यान यजुवेंद्र चहलने सेकेंडला पायचीत करुन त्यांचं शतकाचं स्वप्न अधुरं ठेवलं.
अक्षर पटेलने ब्यूरन हेंड्रिक्स (10) च्या संघर्षावर पूर्ण विराम दिला, तर सिराजने अंतिम क्षणाला डुआने ओलिवर याची विकेट घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दुसरा कसोटी सामना 10 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली. इंग्लंडमध्येही भारतीय युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती.
संबंधित बातमी :
पृथ्वी शॉ 136, मयंक अग्रवाल 220*, भारत अ दुसऱ्या दिवसअखेर 411/2
मोहम्मद सिराजच्या दहा विकेट, द. आफ्रिका अ संघाचा दारुण पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2018 08:55 AM (IST)
संपूर्ण सामन्यात त्याने 129 धावा देऊन दहा फलंदाजांना माघारी धाडलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -