नवी दिल्ली: हैदराबाद आणि छत्तीसगडमधील रणजी सामन्यात ग्रुप सीच्या सामन्यात हैदराबादचा सलामी फलंदाज तन्मय अग्रवालच्या डोक्याला चेंडू लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

'द हिंदू' या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, तन्मय फॉरवर्ड शॉट लेगवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी छत्तीसगडचा फलंदाज मनोज सिंहनं डावखुरा फिरकी गोलंदाज मेहदी हसनच्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. त्यावेळी चेंडू थेट तन्मयच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. पण त्यावेळी कॅच घेण्यासाठी तन्मयनं डाईव्ह मारली आणि तो जमिनीवर कोसळला.

चेंडू लागल्यानंतरही तन्मय शुद्धीत होता. पण नंतर त्याला चक्कर येऊ लागली. त्यानंतर तन्मयला स्ट्रेचरच्या साह्याने मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या डोक्याचं स्कॅनिंग करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून सध्या तन्मयवर उपचार सुरु आहेत.