मॉस्को : इंग्लंडने स्वीडनचा 2-0 असा धुव्वा उडवून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची इंग्लंडची गेल्या 28 वर्षांमधली केवळ दुसरी वेळ आहे.


इंग्लंडने याआधी 1990 साली विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. इंग्लंडच्या उपांत्यपूर्व फेरीतल्या विजयाचे हॅरी मॅग्वायर आणि डेले अॅली हे प्रमुख शिल्पकार ठरले. त्या दोघांच्या गोलनी इंग्लंडला स्वीडनवर खणखणीत विजय मिळवू दिला.

अॅशली यंगच्या कॉर्नरवर हॅरी मॅग्वायरने तिसाव्या मिनिटाला हेड करून इंग्लंडचं खातं उघडलं. मग जेस लिंगार्डच्या क्रॉसवर डेले अॅलीने 59 व्या मिनिटाला हेड करून इंग्लंडचा दुसरा गोल नोंदवला.

उपांत्य फेरीत इंग्लंडची गाठ आता रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील विजेत्याशी होईल. याआधी इंग्लंडने 1966 साली पहिल्यांदा फिफा विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे रशियात सुरु असलेल्या यंदाच्या 21 व्या फिफा विश्वचषकात विजेतेपद मिळवण्याची संधी इंग्लंडकडे आहे.