नवी दिल्ली: आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फिरकीपटू राशिद खानवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या राशिद खानने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, हैदराबादला आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलं आहे.

कोलताच्या ईडन गार्डन्सवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात राशिद खानने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. त्याने गरजेच्या वेळी अवघ्या 10 चेंडूत 34 धावा केल्याने, हैदराबादला कोलकात्यासमोर आव्हानात्मक 175 धावांचं आव्हान ठेवता आलं.

ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादनं कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. राशिद खाने 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याच्या डावाला खिळ घातली. त्यामुळे कोलकात्याला वीस षटकांत नऊ बाद 161 धावांचीच मजल मारता आली.

कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, राशिद खानच्या जबरदस्त कामगिरीनंतर त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. कालच्या सामन्यात त्याने जबरदस्त बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग केली. त्याने चपळाईने थ्रो केल्याने, कोलकात्याचा धडाकेबाज फलंदाज नितीश राणा धावबाद झाला.



इतकंच नाही तर राशिद खानने दोन जबरदस्त झेलही टिपले. त्यामुळे सोशल मीडियावर राशिद खानची वाहवा होत आहे.

राशिद खानने भारताकडून खेळायला हवं, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.



राशिद खान भारताकडून खेळणार?

सोशल मीडियावर कुणी राशिद खानला भारताकडून खेळण्याचं तर कुणी थेट भारताचं नागरिकत्व देण्याची मागणी करत आहे.

याबाबतचे ट्विट नेटिझन्सनी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मेन्शन केले आहेत.

रशिद खानला भारताचं नागरिकत्व देण्याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. मात्र दुसऱ्या देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व देण्याचा अधिकार गृहमंत्रालयाचा आहे, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.

“मी खूप सारे ट्विट पाहिले. नागरिकत्त्व देण्याचा अधिकार गृहमंत्रालयाचा आहे”, असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं होतं. मात्र नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं.

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया

भारतीय चाहत्यांकडून राशिद खानचं कौतुक होत असताना, तिकडे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घणी हे सुद्धा भारावून गेले आहेत. तसंच राशिद खान हा अफगाणिस्तानचा हिरो आहे, त्याला आम्ही सोडणार नाही, असंही अश्रफ घणी म्हणाले.

“आमचा हिरो राशिद खानचा अफगाणिस्तानला अभिमान आहे. मी आमच्या भारतीय मित्रांचे खूप आभारी आहे, ज्यांनी आमच्या खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं. अफगाणिस्तानसाठी काय महत्त्वाचं आहे हे राशिदच्या कामगिरीने अधोरेखित केलं आहे. क्रिकेट विश्वासाठी राशिद एक खजिना आहे. तो आम्ही दुसऱ्यांकडे सोपवणार नाही”, असं म्हणत अश्रफ घणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेन्शन केलं.

आयसीसीचा नियम

आयसीसीच्या नियमानुसार राशिद खान अफगाणिस्तान व्यतिरिक्त दुसऱ्या देशाकडून खेळू शकत नाही. आयसीसीच्या  सामन्यांबाबत ज्या देशांनी करार केला आहे, त्या देशाकडून खेळणारा सदस्य चार वर्षांसाठी दुसऱ्या देशाकडून खेळू शकत नाही, असा आयसीसीचा नियम आहे.

सर्वात तरुण कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात राशिद खान सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. 19 वर्ष आणि 165 दिवसांचा असताना त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं कप्तानपद मिळवलं.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी

अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. उभय संघांमध्ये हा सामना बंगळुरुत 14 ते 18 जून या काळात खेळवला जाईल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहेत.

 राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार 

संबंधित बातम्या

 रशीद खानचं विकेट्सचं वेगवान शतक 

 राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार  

 सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर  

... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी