नवी दिल्लीः टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना तापातून सावरला असला तरी, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यालाही त्याला मुकावं लागणार आहे. खेळण्यासाठी रैना तंदुरुस्त नसल्याचं संघव्यवस्थापनाचं म्हणणं आहे.


भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा वन डे सामना गुरुवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्व तयारीसाठी रैना मंगळवारी भारतीय संघाच्या नेट्समध्येही सहभागी झाला होता.

रैनाने 45 मिनिटं फलंदाजीचा सराव केला. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रैना अजूनही वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने तंदुरुस्त नसल्याचं संघव्यवस्थापनाचं मत झालं आहे.

त्यामुळं रैनाला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी अवधी देण्यात आला आहे. दिल्लीतल्या दुसऱ्या वन डेसाठी रैनाच्या नावाचा विचार करण्यात येणार नसल्याचं बीसीसीआयनेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.