नवी दिल्लीः भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचं वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पुनरागमन तापामुळे लांबणीवर पडलं आहे. रैनानं तब्बल एक वर्षानंतर भारताच्या वन डे संघात पुन्हा स्थान मिळवलं होतं, पण त्याला तापामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.
भारत आणि न्यूझीलंड संघांमधला पहिला वन डे सामना रविवार, 16 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात खेळण्यासाठी सुरेश रैना उत्सुक होता. कारण गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरनंतर तो वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यांपाठोपाठ, झिम्बाब्बे दौऱ्यासाठीही रैनाची निवड करण्यात आली नव्हती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या अमेरिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी त्याला संधी देण्यात आली नाही. पण दुलीप करंडक सामन्यांमधल्या तीन डावांमध्ये रैनाने 52, 35 आणि 90 धावांच्या खेळी उभारल्या. याच कामगिरीमुळे रैनाचं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं पुनरागमन यशस्वी ठरेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. पण रैनाला आलेल्या तापामुळे त्याच्या चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं आहे.