जळगाव: राजर्षी शाहू फी प्रतिपूर्ती योजना लागू करुन दोन तास उलटण्याआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. कारण शिवसेनेची मागणी मान्य करुन ईबीसी सवलत 6 लाखावर नेल्यानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
इतकंच नव्हे तर राज्यभरात यापुढंही मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं सांगायलाही उद्धव विसरले नाहीत. ते आज जळगाव दौऱ्यात जाहीर सभेत बोलत होते.
राजर्षी शाहू योजनेअंतर्गत 6 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या तरुणांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची 50 टक्के फी सरकार भरणार आहे. तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख ते 6 लाख उत्पन्न असलेल्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाचं व्याजही सरकार भरेल.
दरम्यान फी प्रतिपूर्ती योजना सेनेमुळंच लागू झाली हे सांगतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पवारांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनियांकडे पाणी भरताना मराठा आरक्षण का घेतलं नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली.