हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची सुरुवात विजयाने केली आहे. हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 35 धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सने बंगळुरुसमोर विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
बंगळुरुचे सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल आणि मनदीप सिंह यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर मनदीप सिंह 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर 32 धावांवर ख्रिस गेलला दिपक हूडाने चालतं केलं.
केदार जाधव 16 चेंडूत 31 धावा करुन धावबाद झाला. त्यानंतर बंगळुरुच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, रशीद खान आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर बिपूल शर्मा आणि दिपक हूडा यांनी प्रत्येक एक एक विकेट घेतली.
युवराजचं वादळी अर्धशतक
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं. युवराजच्या 62 धावांच्या जोरावर सनरायझर्स 207 धावांपर्यंत मजल मारली. युवराजने 27 चेंडूत 62 धावांची खेळी केली.
बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. बंगळुरुचा गोलंदाज अनिकेत चौधरीने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला केवळ 14 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर सलामीवीर शिखर धवनने मोएसिज हेनरिक्ससोबत 74 धावांची चांगली भागीदारी रचली.
शिखर धवन 31 चेंडूत 40 धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या युवराजच्या फटकेबाजीने हैदराबादची स्थिती मजबूत झाली. सिक्सर किंग का म्हटलं जातं, ते युवराजने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
युवराजने अनिकेत चौधरीच्या एकाच ओव्हरमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार ठोकत पुनरागमनाचे संकेत दिले. युवराजने हेनरिक्ससोबत 58 धावांची भागीदारी केली. हेनरिक्स आयपीएल 10 मध्ये अर्धशतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली.
त्यानंतर युवराजने केवळ 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. युवीने त्याच्या आयपीएल करिअरमधील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं.