नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेतलं आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. शिखर धवन आणि केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 176 धावांची अभेद्य भागीदारी हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरली.


या सामन्यात दिल्लीने विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान हैदराबादने सात चेंडू आणि नऊ विकेट्स राखून पार केलं. हैदराबादचा हा अकरा सामन्यांमधला नववा विजय ठरला. या विजयासह हैदराबादच्या खात्यात आता सर्वाधिक 18 गुण झाले आहेत.

हैदराबादचं प्ले ऑफचं तिकीट आधीच कन्फर्म झालं आहे, पण हैदराबादकडून झालेल्या पराभवाने दिल्लीचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. गुणतालिकेत दिल्ली सध्या सर्वात तळाला आहे. दिल्लीने आतापर्यंत अकरा सामने खेळले असून त्यांच्या खात्यात केवळ सहा गुण आहेत.

रिषभ पंतचं वादळी शतक

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा यष्टिरक्षक रिषभ पंत यंदाच्या आयपीएल मोसमातला तिसरा शतकवीर ठरला. याआधी ख्रिस गेल आणि शेन वॉटसन यांनी यंदाच्या मोसमात शतकं झळकावली आहेत.

रिषभ पंतने सनरायझर्स हैदराबादच्या आक्रमणावर एकहाती हल्ला चढवला. त्याने 63 चेंडूंत नाबाद 128 धावांची खेळी उभारली. त्याने ही खेळी 15 चौकार आणि सात षटकारांनी सजवली. दिल्लीच्या अन्य सहा फलंदाजांनी मिळून 57 चेंडूंत केवळ 56 धावा जमवल्या. त्यामुळे या सामन्यात दिल्लीला वीस षटकांत पाच बाद 187 धावांची मजल मारता आली.