कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरिबियन गोलंदाज सुनील नारायण ईडनवर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या. पण नारायणने 18 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 37 धावा फटकावल्या आणि गौतम गंभीरसह सलामीला 76 धावांची भागीदारी रचून कोलकात्याच्या विजयाचा पाया घातला.


सुनीलला सलामीला खेळवण्याचा निर्णय हा कोलकात्याचा मास्टरस्ट्रोक ठरला. सुनील नारायणच्या गोलंदाजीतल्या कौशल्याबद्दल सर्वांनाच ठावूक आहे, पण तो उत्तम फटकेबाजीही करू शकतो, असं गंभीरने नमूद केलं.

कोलकात्याची फलंदाजांची फळी अगदी भक्कम आहे. त्यामुळे सुनीलला एरवी नवव्या क्रमांकावर फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही. त्याऐवजी त्याला थेट सलामीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गंभीरने म्हटलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला. ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात पंजाबने कोलकात्याला विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. गौतम गंभीरने कर्णधाराला साजेशी खेळी करून कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कोलकात्याने हा सामना तब्बल 21 चेंडू आणि आठ विकेट्स राखून जिंकला. गंभीरने 49 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी उभारली. तसंच आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक धावा केल्यानं गंभीर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. गंभीरला सुनील नारायण, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडेने चांगली साथ दिली. त्याआधी, उमेश यादवने 33 धावांत पंजाबच्या चार फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला.