भुवनेश्वर: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांचं अधिवेशन ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये पार पडणार आहे. 2019साठीचं नवं लक्ष्य म्हणून ओदिशा भाजपच्या रडारवर आहे. ओदिशासह पूर्व किनारपट्टीवरच्या आसपासच्या भागांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न म्हणून यावेळी भाजपनं त्यांच्या ‘लूक इस्ट पॉलिसीअंतर्ग’ओदिशाची निवड केल्याचं समजतं आहे.


नुकत्याच ओदिशात ज्या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपनं आश्चर्यकारकरित्या यश मिळवलं आहे. काँग्रेसला मागे टाकत ओदिशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. त्यामुळे 2019ला बिजू जनता दलाला कडवं आव्हान देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.

2014ला यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसारख्या अनेक राज्यांमध्ये भाजपनं जवळपास पैकीच्या पैकी जागा जिंकल्या होत्या. हा परफॉर्मन्स 2019ला रिपीट होईलच याची खात्री नाही. काही जागा इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळेच दक्षिण भारत, ओदिशा आणि बंगालसारख्या राज्यांमधून काही जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं भाजपाध्यक्ष अमित शहांची नजर या राज्यांकडे आधीच वळली आहे. पण ओदिशातल्या भाजपच्या यशानं त्यांचे डोळे आशेनं जास्त किलकिले झाले आहेत. त्यामुळेच यावेळी ओदिशात राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन इथल्या मतदारांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

अमित शहांच्या खास वर्तुळातले मानले जाणारे धर्मेंद्र प्रधान हे ओदिशाचे आहेत. त्यांच्यावरच या कार्यकारिणीच्या आयोजनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आज अमित शहांच्या आगमनावेळीही ज्या दोन पुष्पहारांनी त्यांचं स्वागत झालं, त्यातही भाजपचं हे टार्गेट 2019 स्पष्ट दिसत होतं. कारण एका हारात 21 फुलं, तर दुसऱ्यात 147 फुलं असे दोन हार अमित शहांच्या गळ्यात घातले गेले.

ओदिशात लोकसभेच्या 21, तर विधानसभेच्या 147 जागा आहेत. लोकसभेवेळीच ओदिशातही विधानसभा निवडणुका होतात. मात्र 2014 मध्ये देशात इतरत्र मोदी लाटेचा जलवा असताना ओदिशात मात्र अवघ्या एका जागेवर भाजपला समाधान मानावं लागलेलं होतं. यावेळी ती कसर भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सगळं भुवनेश्वर या अधिवेशनाच्या निमित्तानं भगवं झालं आहे.

उद्या पंतप्रधान या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होतील. यावेळी एक रोड शो होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे. भाजपचे जवळपास 13 केंद्रीय मंत्री आणि जवळपास 350 पदाधिकारी या अधिवेशनाच्या निमित्तानं भुवनेश्वरमध्ये दोन दिवस तळ ठोकणार आहेत. त्यामुळे ओदिशातल्या जमिनीची 2019च्या दृष्टीनं मशागत करण्याचं काम भाजपनं आतापासूनच सुरु केल्याचं दिसतं आहे.