कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.


श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अखिलाडीवृत्तीचं प्रदर्शन करत नागीन डान्स करणाऱ्या बांगलादेशला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. एवढंच नाही, तर समालोचक म्हणून उपस्थित असलेले टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही नागीन डान्स करत बांगलादेशला उत्तर दिलं.

भारताची फलंदाजी सुरु असताना रुबेल हुसेन गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने चौकार ठोकला. यानंतर लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या सुनील गावसकर यांनी नागीन डान्स केला. गावसकरांचा नागीन डान्स पाहून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही नागीन डान्स सुरु केला.

अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता. मात्र त्या सामन्यात बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयानंतर नागीन डान्स केला. नागीन डान्समुळे बांगलादेशला प्रचंड ट्रोल केलं जात होतं. अखिलाडीवृत्तीचं प्रदर्शन करणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना भारताने खेळातूनच उत्तर दिलं.

कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अटीतटीच्या या सामन्यात दिनेश कार्तिकने विजय खेचून आणला. त्याने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

दिनेश कार्तिकसोबतच भारताकडून रोहित शर्मा 56, लोकेश राहुल 24, मनीष पांडे 28 आणि विजय शंकरने 17 धावांचं योगदान दिलं. मात्र विजयाचा खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 166 असं रोखून आपली कामगिरी चोख बजावली. लेग स्पिनर यजुवेंद्र चहल हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 18 धावा मोजून तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जयदेव उनाडकटने 33 धावांत दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने 20 धावांत एक विकेट घेऊन त्याला छान साथ दिली.

पाहा व्हिडीओ :