सिडनी : चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने सिडनी कसोटीत पहिल्या दिवसअखेर चार बाद 303 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 16 चौकारांसह 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर खेळत होते.


त्याआधी सलामीचा लोकेश राहुल नऊ धावांवर स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने 116 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. मयांक अगरवालने सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक साजरं केलं. त्याने सात चौकार आणि दोन षटकारांसह 77 धावांची खेळी उभारली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पण त्यानंतर आलेल्या हनुमा विहारीसह पुजाराने 75 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

ऑस्ट्रेलियातर्फे जॉश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

INDvsAUS : अखेरच्या कसोटीत टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

पुजाराचं मालिकेतील तिसरं शतक
भारताच्या चेतेश्वर पुजाराने सिडनी कसोटीत कारकीर्दीतलं अठरावं शतक साजरं केलं. या मालिकेतलं पुजाराचं हे तिसरं शतक ठरलं. या कामगिरीसह ऑस्ट्रेलियात एकाच मालिकेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकणारा पुजारा केवळ तिसराच भारतीय फलंदाज ठरला. पुजाराने या मालिकेत अॅडलेड आणि मेलबर्वन कसोटीतही शतकी खेळी साकारली होती. त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार शतकं झळकावली होती. तर लिटल मास्टर सुनील गावसकरांनी 1977-78 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन शतकं ठोकली होती.