मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधलं आपलं अव्वल स्थान गमावलं आहे. आयसीसीने जारी केलेल्या नव्या टेस्ट रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. स्टीव्ह स्मिथ 911 अंकांसह अव्वल स्थानी आहे, तर विराट कोहलीची 906 अंकांसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीतील विराट कोहलीच्या खराब कामगिरीचा फटका त्याला बसला आहे. विराटने वेलिंग्टन कसोटीत पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात अवघ्या 19 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या अंकांमध्ये घसरण झाली आणि स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर पोहोचला, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन तर टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे आठव्या, चेतेश्वर पुजारा नवव्या आणि मयंक अगरवाल दहाव्या स्थानावर आहेत.





विराट कोहलीने 4 डिसेंबर 2019 रोजी स्टीव्ह स्मिथला मागे टाकत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली होती. मात्र केवळ दोनच महिने कोहलीला हे अव्वल स्थान टिकवता आलं आहे. बुधवारी जारी झालेल्या आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा नंबर वन स्थानी झेप घेतली आहे. याआधी 3 सप्टेंबर 2019 रोजी जारी झालेल्या टेस्ट रँकिंगमध्ये स्टिव्ह स्मिथने विराट कोहलीला मागे टाकत झेप घेतली होती. त्यावेळी विराट कोहली सलग 13 महिने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता.


जसप्रीत बुमराहलाही न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत कमाल करता आली नाही. त्यामुळेच त्याची 756 अंकांसह 11 व्या स्थानावर घसरण झाली आहे. सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत भारताचा आर अश्विन एकमेव गोलंदाज आहे. अश्विन 765 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. अश्विनचीही आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स आणि नील वॅगनर हे अव्वल दोन क्रमांकावर आहेत.





संबंधित बातम्या

Laureus world sports awards : सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातील सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान

भारतीय महिलांची विजयी घोडदौड, शेफाली वर्मा-पूनम यादवची निर्णायक कामगिरी