मेलबर्न : बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटवर तब्बल एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान, स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचं समजतं आहे.


केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तात्काळ चौकशी पूर्ण करत स्मिथ आणि वॉर्नरवर बंदीची कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट हे तीनच खेळाडू दोषी आढळले होते. या तीनही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली आहे.

दरम्यान, स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. तर टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं.

बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.

आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत.

बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?

बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो.

माती, बाटलीच्या झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिंट किंवा च्युईंग गम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं किंवा व्हॅसेलिनसारखे पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात.

संबंधित बातम्या :

समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!


VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील

व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास


चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद


तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल


स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!


'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं


क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना


स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई