मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक जण आपलाच संघ जिंकणार, असा दावा करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील आकडेच सांगतात, की पाकिस्तानमधले टीव्ही यावर्षी पुन्हा एकदा फुटणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीत जुने काही विक्रम पाकिस्तानच्या बाजूने असले तरी सध्याचं चित्र वेगळं आहे. सध्याची विराट ब्रिगेड पाकिस्तानच्या टीमवर कशी तुटून पडते, त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या वन डेमध्ये आला होता. त्यामुळे ताजे आकडे भारतासाठी समाधानाची बाब आहे.
भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत दारुण पराभव
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीचं ताजं उदाहरण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला दारुण पराभवाची धूळ चारली होती. या सामन्यात अगोदर भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजी धुलाई केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील हे ताजं उदाहरण यासाठी महत्वाचं आहे, कारण तेच खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वीचे विक्रम काहीही सांगत असले, तरी आता परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गेल्या सामन्यातील पराभवाचा दबावही पाकिस्तानवर असेल.
भारताचे विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी विश्वचषकातील आकडे पाहिले तर भारतच वरचढ असल्याचं दिसून येतं. या दोन्ही टूर्नामेंटमध्ये गेल्या 4 सामन्यांमध्ये भारतानेच विजय मिळवला आहे.
फायनलमध्ये पाकिस्तानचा भारताला धोका
फायनल सामन्यांच्या बाबतीत पाकिस्तानची आकडेवारी चांगली आहे. भारताने आतापर्यंत वन डे फायनलमध्ये 3 विजय मिळवले आहेत, तर पाकिस्तानच्या नावावर 7 विजय आहेत. मात्र भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या पाच सामन्यांपैकी भारताने 4 सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत उभय संघांच्या नावावर समसमान विजय आहेत.
टॉप फलंदाजांमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. तर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाचा समावेश या यादीत नाही. पहिल्या स्थानावर शिखर धवन, दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा, तर पाचव्या स्थानावर विराट कोहली आहे.
पाकिस्तानचं त्यांच्याच माजी खेळाडूंकडून खच्चीकरण
पाकिस्तानने भारताविरुद्ध जिंकण्यासाठी कंबर कसली असली तरी त्यांच्याच देशाचे माजी क्रिकेटर पाकिस्तानचं खच्चीकरण करणं थांबवत नाहीयेत. पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल पाकिस्तानचेच माजी कर्णधार आमीर सोहेल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. एका टीव्ही चॅनलच्या चर्चेदरम्यान ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले की, पाकिस्तानी संघ मॅच फिक्स करुन फायनलमध्ये पोहोचला आहे.
आमीर सोहेल यांनी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, “पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार सरफराज अहमदला अशाप्रकारे आनंद साजरा करायला नको. हा संघ दुसऱ्या कारणांमुळे सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे, आपल्या खेळामुळे नाही.” आता या दुसऱ्या कारणांमध्ये त्यांचा इशारा मॅच फिक्सिंगकडे आहे.
“ही सरफराजची कमाल नाही, तर पाकिस्तानच्या संघाला हा सामना दुसऱ्या कोणतरी जिंकून दिला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मैदानाच्या बाहेर काय घडतं,” असं आमीर सोहेल म्हणाले.
दुसरीकडे साखळी सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच भडकले होते. भारताकडून पराभव झाला असला तरी एवढ्या अंतराने कधीही झाला नव्हता, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दिली होती.