नवी दिल्ली: भारताचे दिवंगत हॉकीवीर ध्यानचंद यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावं, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाला केली आहे. ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोककुमार यांच्यासह एकत्र आलेल्या देशातल्या दिग्गज हॉकीपटूंनी ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी गेली अनेक वर्षे लावून धरली आहे.


2011 साली तर 82 संसद सदस्यांनी एकत्र येऊन त्या मागणीला दुजोरा देणारं निवेदन केंद्र सरकारकडे केलं होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारनं 2013 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न देऊन गौरवलं.

तेव्हापासून ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याच्या मागणीनं आणखी जोर धरला होता. अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानंही ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे आपलं वजन टाकलं आहे. भारताला 1928, 1932 आणि 1936 सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती. ध्यानचंद यांनी आपल्या कामगिरीनं हॉकीचे जादूगार अशी ओळख जगभरात मिळवली होती.