मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आमलानं गेली 15 वर्ष दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं आहे.


मात्र गेल्या काही महिन्यांत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ ओसरला होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकातंही आमला प्रभावी कामगिरी बजावण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे विश्वचषकानंतर निवृत्त होण्याचा त्यानं निर्णय घेतला होता.


एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेननंतर आमलाच्या निवृत्तीनं दक्षिण आफ्रिकेन संघात मोठी पोकळी तयार झाली आहे. आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार आहे.

अमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक 311 धावा केल्या होत्या. त्रिशतक झळकवणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला होता.