मुंबई : भारताची अव्वल बुद्धीबळपटू सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याचा नियम म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन असल्याचं सांगत तिने चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.


जबरदस्तीने धार्मिक कपडे घालण्याचं बंधन खेळांमध्ये नसावं, असं सौम्या स्वामीनाथन म्हणाली. बुद्धीबळमधील महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्युनिअर गर्ल चेस चॅम्पियन सौम्या स्वामीनाथनने फेसबुकवर पोस्ट करुन या नियमाविरोधात आपलं मत मांडलं.

सौम्याने लिहिलं आहे की, "आगामी आशियायी नेशन्स कप चेस चॅम्पियनशिप 2018 मधून माघार घेण्याबद्दल मी भारतीय महिला संघाची माफी मागते. ही चॅम्पियनशिप 26 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान इराणमध्ये होणार आहे. या स्पर्धेत महिलांना डोक्यावर स्कार्फ घेण्यास सांगितलं जात आहे. स्कार्फ किंवा बुरखा परिधान करण्यासाठी माझ्यावर सक्ती केली जाऊ नये. इराणमध्ये लागू असलेले हे नियम माझ्या मानवाधिकाराविरोधात आहेत.

इराणमध्ये डोक्यावर स्कार्फ किंवा बुरखा परिधान करण्याचा नियम माझ्या मानवाधिकाराचं, विशेषत: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य तसंच माझ्या धर्माचं उल्लंघन आहे. मी माझा मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी इराणमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

"अशा चॅम्पियनशिपच्या आयोजनात या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही, हे पाहून निराश झाले. आयोजकांनी आम्हाला देशाच्या संघाचा ड्रेस किंवा स्पोर्टिंग ड्रेस परिधान करण्यास सांगितलं असतं तरी ठीक, पण खेळांमध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक ड्रेसकोड लागू केला जाऊ शकत नाही."

"कोणत्याही स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यात मला अभिमान वाटतो. पण या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होत नसल्याने मला दु:ख होत आहे. एक खेळाडू म्हणून मी खेळासाठी कोणतीही तडजोड करण्यास तयार झाले असते, पण काही गोष्टींमध्ये तडजोड होऊ शकत नाही."



याआधी 2016 मध्ये महिला नेमबाज हिना सिद्धूनेही हिजाब घालण्याच्या नियमामुळे एशियन एअरगन चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती.