रांची: लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी दिलेल्या 91 धावांच्या सलामीच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर एक बाद 120 धावांची मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय 42, तर चेतेश्वर पुजारा 10 धावांवर खेळत होता.


लोकेश राहुलनं या मालिकेतलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 102 चेंडूंत नऊ चौकारांसह 67 धावांची खेळी उभारली. पॅट कमिन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्यानं यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल दिला.

त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 191 धावांच्या भागिदारीनं ऑस्ट्रेलियाला 451 धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाबाद 178 धावांचं योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेलनं 104 धावांची खेळी उभारली.

स्मिथ आणि मॅक्सवेलच्या जात्यात टीम इंडियाचं आक्रमण अक्षरश: भरडून निघालं. अखेर रवींद्र जाडेजाने मॅक्सवेलचा काटा काढून ही जोडी फोडली. त्याच जाडेजाने 124 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. जाडेजानं सलग दुसऱ्या सामन्यात पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे.

स्टीव्ह स्मिथच्या शिरपेचात मानाचा तुरा

रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात नाबाद 178 धावांची खेळी उभारुन स्टीव्ह स्मिथने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला. भारत दौऱ्यातल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरला. हा विक्रम आधी मायकल क्लार्कच्या नावावर होता. त्याने 2012-13 सालच्या चेन्नई कसोटीत 130 धावांची खेळी केली होती. स्टीव्ह स्मिथने क्लार्कचा हा विक्रम 48 धावांनी मागे टाकला.