विशाखापट्टणम : टीम इंडियाने विशाखापट्टणम वन डेत विंडीजला विजयासाठी तब्बल 322 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही. शाय होपने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकाराने वेस्ट इंडिजला वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती.

कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात शतकी खेळी करत वन डे कारकीर्दीतील 10 हजार धावा पूर्ण केल्या. वेगवान दहा हजार धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकरनंतर तो पहिलाच खेळाडू ठरला. सोशल मीडियावर त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं असलं तरी त्याने केलेल्या एका चुकीलाच सामना गमावण्यासाठी कारणीभूत धरलं जात आहे.


भारतीय डावात अकराव्या षटकात विराट कोहली अंबाती रायुडूसोबत फलंदाजी करत होता. नर्सच्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराटने डीप मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला. त्याला आरामात दोन धावा घेण्याची संधी मिळाली. मात्र घाईत त्याने पहिली धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव घेताना क्रीजला बॅट न टेकवताच तो परत धावला. ज्यामुळे यावेळी केवळ एकच धाव खात्यात जमा झाली आणि भारताला 321 धावसंख्या उभारता आली.

विराटच्या चुकीने न मिळालेली ही एक धाव भारताला गोलंदाजी करताना अखेरच्या षटकात महागात पडली. विंडीजला विजयासाठी अखेरच्या षटकात पाच धावा हव्या असताना शाय होपने चौकार ठोकला आणि सामना बरोबरीत सुटला. इथे भारताकडे विराटने गमावलेली ती एकमेव धाव असती तर भारताला विजय मिळवता आला असता.