बंगळुरु/नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीच्या धमाक्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. बंगळुरुत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात षटकांची गती कायम न राखल्यामुळे विराट कोहलीला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.


या सामन्यातील चुकीमुळे विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. आयपीएलकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात विराटच्या नेतृत्त्वातील आरसीबीने पहिल्यांदाच आचारसंहितेचं उल्लंघन केलं, ज्यामुळे विराटला हा दंड भरावा लागेल, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.

धोनीचा धमाका, चेन्नईचा विजय

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने अंबाती रायुडू आणि मग ड्वेन ब्राव्होच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आक्रमणावर हल्ला चढवला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने आणखी एक सनसनाटी विजय मिळवला.

चेन्नईने या सामन्यात बंगळुरुवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 206 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं.

अंबाती रायुडू आणि धोनीची भागीदारी

अंबाती रायुडू आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीने चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मग धोनी आणि ब्राव्होने अवघ्या 11 चेंडूंत 32 धावा ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रायुडूने तीन चौकार आणि आठ षटकारांसह 82 धावांची खेळी उभारली. धोनीने एक चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70, तर ब्राव्होने नाबाद 14 धावांची खेळी केली.

बंगळुरुच्या फलंदाजांची मेहनत निष्फळ

त्याआधी बंगळुरुने सलामीवीर डीकॉकच्या 53 आणि एबी डिव्हिलियर्सच्या 30 चेंडूत तुफानी 68 धावांच्या जोरावर 20 षटकात 205 धावा केल्या. डिव्हिलियर्सने लौकिकाला साजेशी खेळी करत, 8 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने अवघ्या 30 चेंडूत 68 धावा कुटल्या.

याशिवाय मनदीप सिंहने 17 चेंडूत 32 आणि कर्णधार विराट कोहलीने 15  चेंडूत 18 धावा ठोकल्या. मात्र एवढं मोठं आव्हान उभारुनही बंगळुरुला विजय मिळवता आला नाही. धोनीच्या आक्रमणामुळे बंगळुरुच्या फलंदाजांची मेहनत निष्फळ ठरली.