नवी दिल्ली : फिरोजशहा कोटला मैदानावर काल (सोमवार) रंगलेल्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सनसनाटी विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी देखील टिच्चून मारा केला. त्यामुळे पंजाबला 20 षटकात 143 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, पंजाबने या सामन्यात जोरदार लढत दिली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने विजय अक्षरश: खेचून आणला.

या सामन्यात शेवटच्या सहा चेंडूमध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं त्या सहा चेंडूंमध्ये.

पहिला चेंडू : शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. अश्विनने युवा फिरकीपटू मुजीबच्या हातात चेंडू सोपवला. तर फलंदाजीसाठी समोर श्रेयस अय्यर उभा होता. मुजीबने लेग साईडला चांगला लेंग्थ चेंडू टाकला. जो मारणं श्रेयसला कठीण गेलं. त्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही.

दुसरा चेंडू : आता दिल्लीला पाच चेंडूत 17 धावांची गरज होती. यावेळी श्रेयसने चेंडू योग्य पद्धतीने बॅटवर येऊ दिला आणि थेट सीमापार धाडला. यावेळी त्याने थेट षटकारच ठोकला. या षटकाराने दिल्लीच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

तिसरा चेंडू : दिल्लीला 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती. मुजीबने आणखी चांगला चेंडू टाकत श्रेयसला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रेयस एक रन काढू शकत होता. पण त्याने तसं न करता स्ट्राईक स्वत:कडेच ठेवली.

चौथा चेंडू : श्रेयसने चौथ्या चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा फटका हवा तसा बसला नाही. पण यावर त्याला दोन धावा मिळाल्या.

पाचवा चेंडू : दिल्लीला शेवटच्या दोन चेंडूवर 9 धावांची गरज होती. याचवेळी अय्यरने शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देत चौकार ठोकला. यामुळे दिल्लीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

सहावा चेंडू : दिल्लीला सामना टाय करण्यासाठी चार धावा आणि विजयासाठी पाच धावांची गरज होती. याच चेंडूवर श्रेयसने एक मोठा फटका मारला. पण त्याचं टायमिंग चुकलं आणि चेंडू थेट लाँग ऑफला उभ्या असलेल्या फिंचच्या हाती गेला. त्यामुळे श्रेयसची एकाकी झुंज अपयशी ठरली. त्याने 45 चेंडूत 57 धावा केल्या.

VIDEO :


संबंधित बातम्या :

पंजाबचा सनसनाटी विजय, घरच्या मैदानावर दिल्लीचा पराभव