पंजाबचा सनसनाटी विजय, घरच्या मैदानावर दिल्लीचा पराभव
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2018 07:55 AM (IST)
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या श्रेयस अय्यरला अखेरच्या चेंडूवर माघारी धाडून, मुजीब उर रेहमाननं किंग्स इलेव्हन पंजाबला चार धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या श्रेयस अय्यरला अखेरच्या चेंडूवर माघारी धाडून, मुजीब उर रेहमाननं किंग्स इलेव्हन पंजाबला चार धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला. पंजाबचा हा सहा सामन्यांमधला पाचवा विजय, तर दिल्लीचा सहा सामन्यांमधला पाचवा पराभव ठरला. आयपीएलच्या या सामन्यात दिल्लीला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. श्रेयस अय्यरनं मुजीबला षटकार ठोकण्याचा केलेला प्रयत्न लॉन्ग ऑफ सीमारेषेवर अॅरॉन फिन्चच्या हातात झेल देणारा ठरला. या सामन्यात पंजाबनं दिल्लीला विजयासाठी अवघं १४४ धावांचं आव्हान दिलं होतं. श्रेयस अय्यरनं पाच चौकार आणि एका षटकारासह ५७ धावांची झुंजार खेळी उभारली. पण पंजाबच्या प्रभावी आक्रमणासमोर दिल्लीला आठ बाद १३९ धावांचीच मजल मारता आली.