पॅरिस : रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हालेपने फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हालेपने अमेरिकेच्या स्लोआन स्टीव्हन्सचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं.


हालेपने हा सामना 3-6, 6-4, 6-1 असा जिंकत कारकीर्दीतलं पहिलं ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावलं. दोन तास तीन मिनिटे चाललेल्या या लढतीत स्टीव्हन्सने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या हालेपने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत पुढील दोन्ही सेट आपल्या नावावर केले.

हालेपची यंदाच्या वर्षातली ही दुसरी ग्रॅन्ड स्लॅम फायनल होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र फ्रेंच ओपनमध्ये तिने ही कसर भरुन काढताना विजेतेपदाला गवसणी घातली.