ख्रिस गेल... ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेचा किंग.

ख्रिस गेल... षटकारांचा बादशाह.

ख्रिस गेल... गोलंदाजांचा कर्दनकाळ.

ख्रिस गेल... आयपीएलच्या मैदानातला सर्वात धडाकेबाज फलंदाज.

ख्रिस गेल नावाचं वादळ आयपीएलच्या अकराव्या मोसमातही धुमाकूळ घालत आहे.

आयपीएलच्या गेल्या नऊ मोसमात ख्रिस गेलनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या आहेत. यंदाच्या नव्या मोसमातही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावत आहे. फरक इतकाच आधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणारा हा वेस्ट इंडियन यंदा प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. तोही अवघ्या दोन कोटी रुपयांच्या तुलनेत कवडीमोल भावात.

तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल, पण ट्वेन्टी ट्वेन्टीच्या या स्पेशालिस्ट फलंदाजाला विकत घ्यायला एकही फ्रँचाईझी तयार नव्हती. यंदाच्या अकराव्या मोसमाआधीच्या लिलावात एकाही फ्रँचाईझीनं ख्रिस गेलवर पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये बोली लावली नव्हती. मग प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबनं केवळ दोन कोटीची बोली लावून, गेलला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं.

किंग्स इलेव्हन फ्रँचाईझीचा तो निर्णय व्यावसायिकदृष्ट्या भलताच फायद्याचा ठरला. कारण गेलनं यंदाच्या मोसमात पहिल्या चार सामन्यांमध्य़े 161.53 च्या स्ट्राईक रेटनं 252 धावा फटकावल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.  यंदाच्या मोसमात षटकारांच्या यादीतही गेलचा दिमाख मोठा आहे. त्यानं चार सामन्यांमध्ये तब्बल २३ षटकार ठोकले आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाब हा ख्रिस गेलचा आयपीएलमधला आजवरचा तिसरा संघ आहे. 2009 आणि 2010 सालच्या मोसमांत गेल शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्यानंतर 2011 सालापासून सलग सात वर्षे गेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं प्रतिनिधित्व केलं. या सात वर्षांत गेलनं 85 सामन्यांत 3415 धावांचा रतीब घातला होता. तोही 151.20 या स्ट्राईक रेटनं. त्यात पाच खणखणीत शतकं आणि 19 अर्धशतकांचा समावेश होता.

आयपीएल इतिहासावरही ख्रिस गेलच्या नावाचा मोठा ठसा आहे. या स्पर्धेत त्याच्या नावावर सर्वाधिक सहा शतकं आहेत. आयपीएलच्या रणांगणात सर्वाधिक 288 षटकार हे गेलनं ठोकले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमधल्या सर्वाधिक षटकारांच्या यादीत गेलच्या आसपासही कोणी नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माच्या खात्यात 181 षटकार आहेत.

ख्रिस गेलनं एक फलंदाज बजावलेल्या धडाकेबाज कामगिरीनंतरही बंगलोरनं नव्य़ा मोसमासाठी त्याला आपल्या संघात कायम ठेवलं नाही. गेल म्हणतो की, त्याला बंगलोर फ्रँचाईझीनं लिलावात पुन्हा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अख्ख्या लिलावात बंगलोरनं गेलवर बोली लावली नाही.

आयपीएल लिलावात झालेल्या निराशेची ख्रिस गेलनं फार फिकीर केली नाही. त्यामुळंच बंगलोरकडून पंजाबच्या ताफ्यात सामील झाल्यावरही गेलच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहात आहे. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीनं पंजाबला यंदाच्य़ा मोसमात घवघवीत यश मिळवून दिलं आहे.

प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबला आयपीएलच्या इतिहासात आजवर कधीही विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. पण यंदा ख्रिस गेलची कामगिरी किंग्स इलेव्हन पंजाबला विजेतेपदाचं स्वप्न दाखवत आहे.