नवी दिल्ली : उद्या (11 ऑक्टोबर) बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India Vs Afghanistan) सामन्यादरम्यान वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती शुभमन गिलच्या भारताच्या वर्ल्डकपच्या ( ICC Cricket World Cup 2023) उर्वरित सामन्यांमध्ये सहभाग घेण्याबाबत निर्णय घेणार आहे. डेंग्यूसह चेन्नईत उतरलेल्या गिलने आधीच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. गिलला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला, तरी अफगाणिस्तानसह 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना देखील गमावणार आहे.
यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड
गिलला तंदुरुस्त होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड समिती संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहे. त्यामुळे संघाने विनंती केल्यास, यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) किंवा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हे कव्हर म्हणून संघात सामील होऊ शकतात, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.
शुबमन गिलच्या तब्येतीवरून टीम इंडिया चिंतित होताना दिसत आहे. डेंग्यूच्या तापातून बरे झाल्यानंतर चेन्नईच्या रुग्णालयातून गिलला डिस्चार्ज देण्यात आला. टीम इंडिया दिल्लीत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या ब्लॉकबस्टर लढतीसाठी सुद्धा गिलबाबत साशंकता आहे. त्यामुळे गिलच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागाबाबत शंका उपस्थित होत आहे. गिल सर्वात इन-फॉर्म फलंदाज असून वर्षभरात त्याने 1230 धावा ठोकल्या आहेत. पाच शतके आणि अर्धशतकांसह 72.35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गिल चेन्नईला पोहोचल्यावर त्याला ताप आला आणि नंतर डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली.
ऋतुराज गायकवाड बॅकअप सलामीवीर म्हणून पहिली पसंती
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार गिलच्या जागी पर्याय तयार ठेवण्याची आवश्यकता आहे की नाही? यावर निवडकर्ते निर्णय घेऊ शकतात. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान सलामीवीर म्हणून निवडलेला आणि मोहालीत अर्धशतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड, बॅकअप सलामीवीर म्हणून पहिली पसंती असेल. त्यानंतर डावखुरा फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल असेल. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत दोघांनी दमदार कामगिरी केली. इशान किशनने गिलच्या जागी संघात स्थान मिळवले, परंतु त्याला लाभ घेता आला नाही.
तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही
गिलला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. गिलच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले होते. त्याच्या आरोग्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या