Shreyas Iyer KKR Captain : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी अतिशय वेगाने सुरू आहे. या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघाने श्रेयस अय्यरला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणाला कर्णधार करण्यात आलं होतं. 






केकेआरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी माहिती शेअर केली आहे. नितीश राणाच्या जागी संघाने अय्यरला पुन्हा कर्णधार बनवले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. यामुळे नितीशने संपूर्ण हंगामात कर्णधारपद भूषवले. आता अय्यरच्या पुनरागमनाने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नितीशला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अय्यर हा अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे.






कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली. त्यानं नितीश राणाचं कौतुक केलं. अय्यर म्हणाला की, “गेला हंगाम आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. नितीशने जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. माझी जागा भरून काढण्याबरोबरच त्याने चांगली कॅप्टनसी केली.. केकेआरने त्याला उपकर्णधार केल्याचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे संघाची ताकद वाढेल यात शंका नाही.






आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये KKR 7 व्या क्रमांकावर होता. त्याने 14 सामने खेळले आणि 4 जिंकले. केकेआरला 8 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रिंकू सिंहने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. रिंकूने 14 सामन्यात 474 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 4 अर्धशतके झळकावली. रिंकूची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 67 होती. 


गौतम गंभीरही संघात परतला


दुसरीकडे, येत्या हंगामात टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मार्गदर्शक (KKR Mentor) असेल. यापूर्वी तो लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाच्या मार्गदर्शकची भूमिका बजावत होता. आयपीएल 2023 च्या समारोपानंतर, गौतम गंभीरनं शाहरुख खानची भेट घेतली होती, तेव्हापासूनच गौतम गंभीर आयपीएल 2024 साठी कोलकाता संघात सामील होऊ शकतो, अशा चर्चा सुरू होत्या. गौतमनं यापूर्वीही केकेआरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. गौतमच्या नेतृत्त्वात कोलकातानं एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या