मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बंगळुरूच्या मैदानावरील सामना सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पण या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राजस्थान रॉयल्सच्या श्रेयस गोपालने. श्रेयसने यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्या हॅटट्रिकची नोंद केली. आयपीएल कारकिर्दीतली त्याची ही पहिलीच हॅटट्रिक ठरली.


श्रेयस गोपालसाठी ही हॅटट्रिक खूप खास होती. श्रेयसने दुसऱ्याच षटकातल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस या धडाकेबाज फलंदाजांना माघारी धाडलं.

आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही अठरावी हॅटट्रिक ठरली आहे. यंदाच्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबच्या सॅम करननं दिल्लीविरुद्ध पहिली हॅटट्रिक साजरी केली होती.

मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स संघातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पाच-पाच षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना पाच षटकांत सात बाद 62 धावा उभारल्या. पण त्यानंतर राजस्थानच्या डावाला सुरुवात झाल्यावर तिसऱ्या षटकात पावसानं पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी उर्वरित खेळ रद्द केला. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.